ITB Berlin मध्ये गोव्याचा झेंडा उंचावला; पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार
गोव्याचे पर्यटन केवळ समुद्रकिनारे, पार्टी आणि नाईटलाइफ यापुरते मर्यादित न ठेवता राज्याच्या अंतर्गत भागातील पर्यटन, आध्यात्मिक वारसा आणि शाश्वत विकासाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या धोरणांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान (IT) मंत्री रोहन अशोक खंवटे यांना नुकत्याच जर्मनीतील ITB Berlin या जागतिक पर्यटन परिषदेत ‘Tourism Minister of the Year – Innovation (Asia)’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पर्यटन क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून गोव्याला जागतिक पर्यटन नकाशावर नव्या रूपात सादर केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
गोवा पर्यटनाला ‘Beyond Beaches’ची नवी ओळख
Goa Beyond Beaches ही संकल्पना प्रभावीपणे गोव्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गोव्याची ओळख केवळ ‘Sun, Sand and Sea’ एवढीच न ठेवता, राज्यातील ग्रामीण भाग, सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळांना पर्यटनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला जात आहे. यामुळे अंतर्गत भागातील पर्यटनाला चालना मिळत असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत आहे असे मंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले.
आध्यात्मिक पर्यटनाला चालना
गोव्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी ‘एकादश तीर्थ सर्किट’ विकसित करण्यात येत आहे. राज्यातील ११ प्रमुख ऐतिहासिक मंदिरांना जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे आध्यात्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. याचबरोबर ‘दक्षिण काशी ते उत्तरकाशी’ या संकल्पनेअंतर्गत उत्तराखंड राज्यासोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून धार्मिक पर्यटनासाठी नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पर्यटकांची सुरक्षा
पर्यटकांना अधिक सुरक्षित आणि सुलभ सेवा देण्यासाठी गोवा पर्यटन विभागाने अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ‘Beach Vigil’ आणि ‘Let’s Goa’ या मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच २४ तास कार्यरत 1364 हेल्पलाईन आणि AI आधारित चॅटबॉटच्या मदतीने पर्यटकांना तातडीची माहिती व मदत पुरवली जात आहे.
महिला सक्षमीकरणासह ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन
ग्रामीण पर्यटनाचा विस्तार करण्यासाठी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पर्यटन विभागाने जागतिक दर्जाच्या Airbnb सारख्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील होमस्टे व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात असून महिला बचत गटांना आर्थिक अनुदान आणि आवश्यक प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होत आहे.
पारंपरिक उत्सवांना मिळतेय जागतिक व्यासपीठ
गोव्यातील चिखलकाला, शिग्मोत्सव आणि साओ जाओ यांसारख्या पारंपरिक उत्सवांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘Experiential Tourism’ अर्थात अनुभवाधारित पर्यटनावर भर देत पर्यटकांना गोव्याची संस्कृती, परंपरा आणि स्थानिक जीवनशैली जवळून अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.
शाश्वत पर्यटनावर विशेष भर
गोवा पर्यटन विभागाने शाश्वत पर्यटन (Sustainable Tourism), डिजिटल नवकल्पना आणि स्थानिक समुदायाच्या सहभागाला प्राधान्य देणारे धोरण स्वीकारले आहे. पर्यावरणपूरक पर्यटनासोबतच स्थानिकांना रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नांमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी दिशा मिळत असून, त्याचाच गौरव म्हणून मंत्री रोहन खंवटे यांना हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.



