गोवन संस्कृतीडिजिटल गोवा वार्ता

गोव्याच्या वारकरी परंपरेला शासनाचा हातभार; वारकरी दिंड्यांसाठी अर्थसहाय्य योजना सुरू

गोव्यातील वारकरी परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंढरपूर व इतर धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या वारकरी दिंड्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या योजनेमुळे वारकरी संप्रदायाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना बळ मिळणार आहे. राज्यातील नोंदणीकृत वारकरी दिंड्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, दिंडींच्या प्रवास, आयोजन आणि इतर आवश्यक खर्चासाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

वारकरी परंपरेच्या जतनासाठी विशेष पुढाकार

Digital Goa Varta

गोव्यात अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा जपली जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री रमेश तवडकर यांच्या पुढाकारातून कला आणि संस्कृती संचनलायामार्फत नोंदणीकृत वारकी दिंड्यांसाठी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे.

नोंदणीकृत दिंड्यांना मिळणार लाभ

या योजनेअंतर्गत शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार नोंदणीकृत वारकरी दिंड्यांना अर्थसहाय्य दिले जाईल. यामध्ये १ ते ५ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाणार आहे. याशिवाय वारकऱ्यांना ओळखपत्र, बटवा, टोपी आणि मेडिकल किटही दिली जाणार आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीसह विविध धार्मिक सोहळ्यांत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यामागे या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि प्रोत्साहन हा प्रमुख उद्देश आहे.

वारकरी संप्रदायाला मिळणार बळ

वारकरी संप्रदायाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आर्थिक मदतीमुळे ग्रामीण भागातील अनेक वारकऱ्यांना वारीत सहभागी होणे अधिक सुलभ होणार असून, गोव्यातील वारकरी चळवळीला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जपण्याचा प्रयत्न

राज्य सरकारचा हा उपक्रम केवळ आर्थिक मदत देणारा नसून, गोव्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करणारा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. यामुळे युवा पिढीला वारकरी परंपरेची ओळख होण्यासही मदत होणार आहे.

Related Articles

Back to top button