गोवागोवा पर्यटनडिजिटल गोवा वार्ता

पर्यटकांनो सावधान! गोव्यात भाड्याच्या थार वाहनांबाबत बदलणार नियम

गोव्यात पर्यटकांकडून भाड्याने घेतल्या जाणाऱ्या थार (Thar) एसयूव्ही गाड्यांशी संबंधित वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री मौविन गोडिन्हो (Mauvin Godinho) यांनी सांगितले की, ‘रेंट-अ-कार’ व्यवसायासाठी नवीन थार वाहन परवान्यांवर (Driving License) निर्बंध आणण्याचा प्रस्ताव लवकरच राज्य परिवहन प्राधिकरण (STA) समोर ठेवला जाणार आहे. अंतिम निर्णय STA च्या बैठकीत घेतला जाईल.

नवीन परवान्यांवर निर्बंध

Digital Goa Varta

मौविन गोडिन्हो यांनी सांगितले की, थार वाहनांमुळे वाढणाऱ्या अपघातांबाबत सरकार गंभीर आहे. अपघातांची कारणे आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा करण्यात आली आहे. कायदेशीर अडचणी नसत्या तर भाड्याने देण्यात येणाऱ्या थार वाहनांवर पूर्ण बंदी घालण्याचाही सरकारचा विचार होता. मात्र, सध्या तरी नवीन परवान्यांवर निर्बंध आणण्याचा निर्णय सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने घेतला जात आहे.

पर्यटकांकडून चालवल्या जाणाऱ्या थार गाड्यांमुळे वाढले अपघात

अलिकडच्या काही महिन्यांत भाड्याने घेतलेल्या थार वाहनांमुळे अनेक गंभीर अपघात घडले आहेत. विशेषतः पर्यटकांकडून चालवल्या जाणाऱ्या या गाड्यांचा यात मोठा सहभाग असल्याचे समोर आले आहे. मे महिन्यात उत्तर गोव्यात एका भाड्याच्या थारने स्कूटरला धडक दिल्याने 32 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर एका अल्पवयीन मुलाला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणात वाहन चालवणारा पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही मध्य प्रदेशातील 65 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही एका भाड्याच्या थार वाहनाने त्यांच्या कारला धडक दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

रेंट-अ-कार ऑपरेटर्सचे ऑडिट होणार

परिवहन विभाग आता राज्यातील सर्व रेंट-अ-कार (Rent A Car) ऑपरेटर्सची तपासणी करणार आहे. वाहन परवाना देताना आवश्यक असलेल्या अटींचे पालन होत आहे का?, पुरेशी पार्किंग व्यवस्था आहे का?, याची पडताळणी केली जाईल.याशिवाय सर्व भाड्याच्या वाहनांमध्ये वाहन लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस (VLTD) आणि स्पीड गव्हर्नर योग्य प्रकारे बसवले आहेत का? याचीही विशेष तपासणी केली जाणार आहे.

मद्यधुंद वाहनचालकांवर कडक कारवाई

गोवा सरकारने मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर अधिक कठोर भूमिका घेतली आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित चालकाला तात्काळ अटक केली जाईल. आवश्यकतेनुसार वाहन पुरवणाऱ्या कंपन्यांवर किंवा ऑपरेटर्सवरही कारवाई करण्यात येणार आहे.

स्पीड गव्हर्नरमध्ये छेडछाड; 200 हून अधिक प्रकरणे उघड

परिवहन विभागाच्या तपासणीत अनेक रेंटल वाहनांमधील अनिवार्य स्पीड गव्हर्नरमध्ये छेडछाड झाल्याचे उघड झाले आहे. काही ऑपरेटर्स स्पीड गव्हर्नर डिस्कनेक्ट करत असल्याचे किंवा लपविलेले स्विच बसवून वेगमर्यादा निष्प्रभ करत असल्याचे आढळले आहे.जून महिन्यापासून अशा 200 हून अधिक प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्यांना 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. तसेच वारंवार नियम मोडल्यास वाहन परवानाही निलंबित केला जाऊ शकतो.

15 जुलैपासून AI ट्रॅफिक कॅमेऱ्यांकडून ई-चलान

रस्ते सुरक्षेसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारने राज्यातील 26 ठिकाणी AI आधारित स्मार्ट ट्रॅफिक कॅमेरे बसवले आहेत. हे कॅमेरे 15 जुलैपासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना स्वयंचलित ई-चलान पाठवण्यास सुरुवात करतील.तोपर्यंत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दंडाऐवजी जनजागृती करणारे संदेश पाठवले जातील, जेणेकरून नागरिकांना नव्या प्रणालीची माहिती आणि सवय होईल.

Related Articles

Back to top button