गोवाडिजिटल गोवा वार्ता

स्वातंत्र्यसैनिक ते यशस्वी उद्योजक; दाद देसाई यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा पणजीत गौरव

गोव्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योजक रोहिदास देसाई उर्फ ‘दाद देसाई’ यांच्या कार्याचा गौरव करणारा विशेष सत्कार समारंभ पणजी येथे उत्साहात पार पडला. स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, सामाजिक बांधिलकी, मैत्री आणि कर्मचाऱ्यांप्रती असलेली निष्ठा यासाठी दाद देसाई यांचा विविध मान्यवरांनी गौरव केला.पणजीतील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री श्री लुइज़िन्हो फालेरो (Luizinho Faleiro) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पोर्तुगीजांविरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभाग

Digital Goa Varta

कुंकोलिम (Cuncolim) गावचे रहिवासी असलेले दाद देसाई हे गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यांनी ‘आझाद गोमांतक दल’च्या माध्यमातून पोर्तुगीज सत्तेविरोधात आंदोलनात सहभाग घेतला होता. आजच्या घडीला गोव्यात मोजकेच स्वातंत्र्यसैनिक शिल्लक असून, त्यामध्ये दाद देसाई यांचे नाव आदराने घेतले जाते.

उद्योजकतेतही घडवला वेगळा ठसा

सुमारे ५० वर्षांपूर्वी दाद देसाई यांनी कुंकोलिमहून पणजीत येऊन ‘Ritz Classic’ या नावाने रेस्टॉरंट व्यवसायाची सुरुवात केली. त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आज गोव्यात 9 रेस्टॉरंट्सचे जाळे उभे राहिले आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे ते गोव्यातील लोकप्रिय उद्योजक म्हणून ओळखले जातात.

निवृत्त अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही सन्मान

या कार्यक्रमात निवृत्त पोलीस अधीक्षक (SP) संतोष देसाई आणि निवृत्त एसपी शेख यांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, दाद देसाई यांनी आपल्या संस्थेत ३०, ३५ आणि ४० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही तितक्याच सन्मानाने गौरव केला. कर्मचाऱ्यांप्रती असलेली त्यांची कृतज्ञता आणि जिव्हाळा यावेळी विशेषपणे अधोरेखित झाला.

दाद देसाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे मान्यवरांकडून कौतुक

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दाद देसाई यांच्या परिश्रमशील स्वभावाचे, सामाजिक कार्याचे आणि लोकांशी जपलेल्या आत्मीय नात्याचे कौतुक केले. त्यांच्या धर्मपत्नी गोकुळा रोहिदास देसाई याही या प्रसंगी उपस्थित होत्या. याशिवाय दाद देसाई यांनी आयुष्यभर जपलेली मैत्री, समाजसेवा आणि राष्ट्रप्रेम यांचा अनेक वक्त्यांनी विशेष उल्लेख केला.

शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भेट

डिजिटल गोवा वार्ता चे को-प्रमोटर्स आणि उद्योजक रघू सेठिया यांनी दाद देसाई यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक प्रतिमा भेट देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी बोलताना रघू सेठिया यांनी दाद देसाई हे राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि मैत्री जपण्याचे आदर्श उदाहरण असल्याचे सांगितले. “मैत्री कशी जपावी आणि समाजाशी नाते कसे टिकवावे, हे दाद देसाई यांच्याकडून शिकण्यासारखे आहे,” असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या भेटीमुळे आणि दाद देसाई यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाच्या स्मरणामुळे कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

Related Articles

Back to top button